Home क्राईम ब्रेकींग : कारागृहातच ‘गँगवॉर’ : झोपलेल्या बंदीवर चौघांकडून जीवघेणा हल्ला

ब्रेकींग : कारागृहातच ‘गँगवॉर’ : झोपलेल्या बंदीवर चौघांकडून जीवघेणा हल्ला


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कारागृहात बुधवारी २९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता बॅरेक क्रमांक २ मध्ये दोन बंदी गटांमधील वैमनस्यातून एका बंदीला चार जणांनी शिवीगाळ करून टणक वस्तूने डोक्यावर वार करत गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कारागृहातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

काय घडले नेमके?
तेजस दिलीप सोनवणे (वय २५, रा. कांचन नगर, जळगाव) हा एका गुन्ह्यात जिल्हा कारागृहात बंदी आहे. बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास तेजस सोनवणे बॅरेक २ मध्ये झोपलेला असताना, याच कारागृहातील चार बंदींनी त्याला घेरले. आरोपी बंदींमध्ये पराग रविंद्र आरखे, बबलू उर्फ विशाल राजू गागले, भूषण विजय माळी उर्फ भाचा आणि सचिन कैलास चव्हाण यांचा समावेश होता. या चौघांनी तेजसला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

तेजसने शिवीगाळ करण्याचे कारण विचारले असता, आरोपींनी “तू भूषण माळी उर्फ भाचा याचा विरोधक आहेस, तू त्याचे नादी लागतो का?” असे धमकावले. यानंतर चौघांनी तेजसला शिवीगाळ करत, त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस काहीतरी टणक वस्तूने वार करून गंभीर जखमी केले. एवढेच नव्हे, तर त्याला जीवे ठार मारण्याची धमकी देखील देण्यात आली.

हा सर्व प्रकार सुरू असतानाच, कर्तव्यावर असलेल्या जेल शिपायांनी धाव घेऊन मध्यस्थी केली आणि भांडण सोडवले. या मारहाणीत जखमी झालेल्या तेजस सोनवणे याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या गंभीर घटनेनंतर रात्री ९.३० वाजता जखमी तेजस सोनवणे याच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आरोपी पराग आरखे, बबलू गागले, भूषण माळी उर्फ भाचा आणि सचिन चव्हाण या चार बंदींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Protected Content

Play sound