
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील महाबळ परिसरात बुधवारी ६ ऑगस्ट रोजी दुपारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. भावना राकेश जाधव (वय ७१) या वृद्ध महिलेचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

महाबळ परिसरात आपल्या कुटुंबियांसह वास्तव्य करणाऱ्या भावना जाधव या रोजच्या प्रमाणे दुपारी कपडे सुकवण्यासाठी टाकलेल्या तारा तपासत होत्या. यावेळी कपडे काढत असताना अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. घटनेनंतर लगेचच घरातील सदस्य आणि शेजाऱ्यांनी धाव घेतली आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषीत केले.
या घटनेनंतर जाधव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातील नागरिकांमध्येही शोककळा पसरली आहे. वृद्ध महिलांचा असा अचानक मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. नातेवाईकांनी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गाठून अधिकृत प्रक्रिया पूर्ण केली. दरम्यान, रामानंद नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद घेण्याचे काम सुरू होते. विजेच्या तारा किंवा वायरिंगमध्ये झालेला दोष किंवा उघड वायरींगमुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



