ब्रेकींग : घराच्या वाटणीतून तरुणाचा निर्घृण खून; वडील आणि भावाला अटक

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील बाळद खुर्द गावात घराच्या वाटणीवरून झालेल्या भीषण वादात एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी रोजी सकाळी आली आहे. बाळू राजेंद्र शिंदे असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी मयत बाळूचे वडील राजेंद्र शिंदे आणि भाऊ भारत शिंदे यांना अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण भडगाव तालुका हादरला असून, भडगाव पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, भडगाव तालुक्यातील बाळद खुर्द येथे राजेंद्र शिंदे आपल्या कुटुंबासोबत राहतात. मागील काही महिन्यांपासून त्यांच्या घरात घराच्या हिस्सेवाटणीवरून वाद सुरू होता. याच पार्श्वभूमीवर, राजेंद्र शिंदे आणि त्यांचा दुसरा मुलगा भारत शिंदे यांनी मिळून बाळू शिंदे याला घराच्या वाटपात जास्त हिस्सा मागत असल्याच्या कारणावरून शिवीगाळ करत मारहाण केली. इतकेच नव्हे, तर दोघांनी मिळून बाळूला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि त्यानंतर लाकडी दांडक्याने त्याच्या चेहऱ्यावर आणि छातीत जबर प्रहार केले, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

आज सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. पोलीस पाटील सुनील पाटील यांनी तातडीने भडगाव पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी वडील राजेंद्र शिंदे आणि भाऊ भारत शिंदे यांना अटक केली आहे. दरम्यान, मृत बाळू शिंदे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भडगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Protected Content