जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या एका लिपिकाला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज, मंगळवारी दुपारी रंगेहात अटक केली आहे. या खळबळजनक कारवाईमुळे संपूर्ण महानगरपालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एसीबी पथकाने संबंधित लिपिकाला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, एका तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लिपीकाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, आज मंगळवारी १९ ऑगस्ट रोजी दुपारी चार ते पाच वाजेच्या सुमारास एसीबीच्या पथकाने कारवाईचे नियोजन केले.

जळगाव महानगरपालिकेच्या १७ मजली इमारतीमधील आरोग्य विभागात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात लिपीकाला पकडले. या कारवाईमुळे महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पाडली. कारवाईनंतर लिपीकास ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे.



