जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत अखेर सर्वात मोठी राजकीय घडामोडी घडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या युतीवर अखेर शिक्कामोर्तब झाले असून, जळगाव महापालिकेसाठी भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांनी आपली युती अधिकृतपणे जाहीर केली आहे. या संदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आ. मंगेश चव्हाण यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

दिग्गज नेत्यांची उपस्थिती
जळगाव एमआयडीसी परिसरातील एका खासगी हॉटेलमध्ये बुधवारी पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला राज्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, खासदार स्मिताताई वाघ, माजी महापौर नितीन लढ्ढा, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, आमदार चंद्रकांत सोनवणे आणि आमदार अमोल पाटील यांसह दोन्ही पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून युती होणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता होती, ज्याला आता पूर्णविराम मिळाला आहे.

राष्ट्रवादीच्या समावेशाकडे लक्ष
भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती झाली असली तरी, महायुतीचा तिसरा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. या संदर्भात माहिती देताना पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत स्वतंत्र बैठक घेऊन जागावाटपाचा अंतिम निर्णय घेतला जाईल. राष्ट्रवादीला सोबत घेऊन जळगावात ‘महायुती’चाच झेंडा फडकवण्याचा विश्वास नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.



