शेंदुर्णी ता.जामनेर , प्रतिनिधी । शेंदूर्णीतील १०० वर्षाची परंपरा असलेला श्रीराम जन्मोत्सव सोहळा कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. परंतु, कोरोना महामारीमुळे साध्या पद्धतीने राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड यांच्या हस्ते पूजा व अभिषेक करण्यात आला.
खानदेशचे प्रती पंढरपुर म्हणुन परिचित असलेल्या शेंदुर्णी नगरीतील संतकवीतिलक वै. भीमराव मामा पारळकर यांनी सुरू केलेला , कै.गोविंदराव पारळकर यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने सुरू ठेवलेल्या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे यंदाचे १०० वे वर्ष आहे. मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता यंदाचा श्रीराम जन्मोत्सव सोहळा ,यात होणारे कीर्तन , धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. करोना लवकरच हद्दपार व्हावा यासाठी घरातुनच सर्वांनी प्रभु रामाच्या चरणी प्रार्थना करण्याचे आवाहन श्रीरामचंद्र देवस्थान यांच्या वतीने करण्यात आले.
खान्देशात या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यात भारतातील नामवंत, प्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार यांनी श्रीरामरायाच्या चरणी आपली सेवा अर्पण केली आहे. आज सकाळी पारंपारिक पद्धतीने राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड यांच्या हस्ते श्रीरामरायाच्या चरणी अभिषेक पुजा व आरती करण्यात आली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अभिषेक झाल्यानंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे.
शासनाने ठरवुन दिलेल्या नियम व अटींचे पालन करुन श्रीरामचंद्र देवस्थान शेंदुर्णी यांनी श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यातील सर्व धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, श्रीराम जन्मसोहळा,पालखी मिरवणुक यंदा रद्द केले असून मागच्या वर्षी सुद्धा पहिल्यांदाच उत्सवात खंड पडला होता. आज पहिल्यांदाच मंदिराचे चालक कै.गोविंदराव पारळकर यांच्या आठवणीने भाविक गहिवरले होते.