Breaking : लॉकडाऊनचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढला

मुंबई प्रतिनिधी । कोरोनाचा प्रादूर्भाव पूर्णपणे नष्ट करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधानांसोबत झालेल्या चर्चेनंतर राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे.

कोरोनाच्या प्रतिकारासाठी देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे कोरोनाचा प्रकोप बर्‍यापैकी आटोक्यात आला असला तरी काही राज्यांमध्ये याची स्थिती अतिशय गंभीर बनलेली आहे. यामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याची मागणी देशातील बहुतांश राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आधीच हा कालावधी वाढण्याचे संकेत दिले होते. या पार्श्‍वभूमिवर, आज पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून चर्चा केली. यानंतर राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज सायंकाळी पाच वाजता राज्यातील जनतेला केलेल्या संबोधनात याबाबतची घोषणा केली.

उध्दव ठाकरे म्हणाले की, मुंबई व पुणे येथे कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. राज्यात आजवर ३३ हजार चाचण्या झाल्या असून यातील १९ हजार हे मुंबईतील आहेत. विशेष करून मुंबईत याचे प्रमाण जास्त असले तरी जिथे रूग्ण आढळले त्या भागाला प्रशासनाने पूर्णपणे सील केले आहे. यामुळे या भागातील प्रसार आटोक्यात आला आहे. कोरोनाचा धोका हा ६० वर्षावरील व्यक्तींना मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यामुळे ज्येष्ठांना जपण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. कोरोनाचा गुणाकार कमी झाला असून हा दर शून्यावर आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.

१४ तारखेनंतर लॉकडाऊन कायम राहणार असले तरी कृषीसह अन्य अत्यावश्यक बाबींची वाहतूक चालू राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. ते म्हणाले की, राज्यात किमान ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. यात काही ठिकाणी नियम कडक होणार असून काही ठिकाणी सवलत मिळणार आहे. तुम्ही खबरदारी घ्या…आम्ही जबाबदारी घेतो असे ठाकरे म्हणाले.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content