नवी दिल्ली वृत्तसंस्था । नागरिकांनी जनता कर्फ्यू यशस्वी केला असला तरी कोरोनाचा पूर्ण प्रतिकार करायचा असेल तर सोशल डिस्टन्सींग आवश्यक असल्याचे प्रतिपादन करत मध्यरात्रीपासून देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात येत असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राला संबोधीत करतांना केली.
पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच जनता कर्फ्यू जाहीर केला होता. हा कर्फ्यू जाहीर केल्यानंतर आज पंतप्रधान काय बोलणार याबाबत उत्सुकता होती. त्यांनी जनता कर्फ्यू यशस्वी केल्याबद्दल जनतेचे आभार मानले. ते पुढे म्हणाले की, कोरोनाच्या प्रतिकारासाठी त्याच्या संक्रमणाच्या चक्राला तोडणे गरजेचे आहे. यासाठी सोशल डिस्टन्सींग हाच एकमात्र उपाय आहे. केवळ रूग्णच नव्हे तर प्रत्येकासाठी हे आवश्यक आहे. अनेक राज्य सरकारांनी कालपासून लॉकडाऊन केले असून याला आपण गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. आज रात्रीपासून पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली.
हा लॉकडाऊन २१ दिवसांसाठी असणार आहे. अर्थात १४ एप्रिलपर्यंत पूर्ण देश लॉकडाऊन असणार आहे. हा कालावधी जनता कर्फ्यूपेक्षा अजून कडक असेल. यातील निकष कठोर असून याचे पूर्णपणे पालन करण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. तर कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी केंद्र सरकारने १५ हजार करोड रूपयांचे पॅकेज जाहीर केल्याची घोषणादेखील त्यांनी केली.