अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्राभिमानाने रंगलेला दिवस अमळनेर तालुक्यातील ब्राह्मणे गावासाठी विशेष ठरला. या दिवशी केवळ राष्ट्रगीतच नव्हे, तर कायद्याची अंमलबजावणी आणि सामाजिक जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण घडले. पोलिस पाटील गणेश भामरे यांनी आपल्या कार्यकुशलतेने आणि तात्काळ निर्णयक्षमतेने गावात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतूकीवर धडक कारवाई करत एक ट्रॅक्टर महसूल कार्यालयात जमा केले. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असली तरी, पोलिस व महसूल विभागाच्या सहकार्यातून घडलेली ही कारवाई गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे यशस्वी ठरली.

गुप्त माहितीच्या आधारे पांझरा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक होत असल्याचे समजताच गणेश भामरे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानंतर कोणतीही विलंब न करता प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा आणि सपोनि जीभाऊ पाटील यांच्याशी तातडीने संपर्क साधला. बाम्हणे फाटा येथे ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या मदतीने बैठे पथक तयार करण्यात आले. काही वेळातच एक ट्रॅक्टर अवैध वाळूसह पकडण्यात आला. या वेळी ट्रॅक्टर मालकाने खोटा कांगावा करून मारहाणीचा आरोप करण्याचा प्रयत्न केला, परंतु जागरूक ग्रामस्थांनी त्याला उधळून लावले.

घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक विनोद पवार, संजय पाटील, एपीआय सुनिल पाटील, हेड कॉन्स्टेबल संजय पाटील आणि संजय सूर्यवंशी यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. महसूल विभागाकडून मंडळ अधिकारी पी.एस. पाटील, ग्राम महसूल अधिकारी भूषण पाटील, संदीप माळी, जितेंद्र पाटील, आर.के. पाटील, कल्पेश कुँवर, प्रदीप भदाणे, भूपेश पाटील हे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ट्रॅक्टर वाळूसह ताब्यात घेतले व पोलिस बंदोबस्तात अमळनेर तहसील कार्यालयात जमा केले.
या यशस्वी कारवाईसाठी पोलिस पाटील गणेश भामरे यांच्यासह त्यांच्या टीममधील पोलिस पाटील भाऊसाहेब पाटील (सबगव्हाण), प्रदीप चव्हाण (शिरसाळे खु.), महेंद्र पाटील (ढेकूचारम), दीपक पाटील (ढेकूसिम), कपिल पाटील (भरवस), ग्राम महसूल अधिकारी विकेश भोई, ग्राम महसूल सेवक सागर पाटील व सजग ग्रामस्थ मंडळ यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या कारवाईमुळे महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेसह ग्रामस्तरावरील पोलिस पाटील आणि स्थानिक नागरिकांची सजगता अधोरेखित झाली आहे. अवैध वाळू वाहतुकीविरोधात ग्रामपातळीवरूनच निर्णायक पावले उचलण्याची ही प्रेरणादायी घटना ठरली आहे.



