फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात ‘ग्रंथपाल दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या ग्रंथालयात आयोजित या कार्यक्रमात डॉ. रंगनाथन यांच्या ग्रंथालय शास्त्रातील अतुलनीय योगदानाला उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात उपप्राचार्य डॉ. मनोहर सुरवाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी ग्रंथालय समिती समन्वयक प्रा. डॉ. राजेंद्र ठाकरे, उपप्राचार्य डॉ. हरिष नेमाडे, उपप्राचार्या डॉ. कल्पना पाटील यांच्यासह अनेक प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी ग्रंथालय समितीचे समन्वयक प्रा. डॉ. राजेंद्र ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व समजावून सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी आणि नेपोलियन यांच्या वाचनाबद्दलच्या मतांचा उल्लेख करून त्यांनी वाचन किती महत्त्वाचे आहे, हे पटवून दिले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. सुरवाडे यांनी डॉ. रंगनाथन यांच्या कार्याचा गौरव करताना, ‘ग्रंथालय ही चैनीची वस्तू नसून जीवनावश्यक गरज आहे’ या विचारावर भर दिला. ‘ग्रंथालय हे ज्ञानाचे दालन आहे’ या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. डॉ. रंगनाथन यांनी ग्रंथालय शास्त्रासाठी मांडलेले पाच मूलभूत सिद्धांत आजही कसे मार्गदर्शक ठरत आहेत, हेही त्यांनी सांगितले. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून नयना नरेंद्र पाटील आणि हेमंत येवले यांनी आपले वाचनाचे अनुभव उत्स्फूर्तपणे मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल आय. जी. गायकवाड यांनी केले, तर आभारप्रदर्शन यू. आर. पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहर्ष चौधरी, सुरेखा सोनवणे आणि सौ. यामिनी पाटील यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.



