जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरापासून जवळ असलेल्या विमानतळ येथे प्रशिक्षणार्थ विमान आज दुपारी घसरल्याने खळबळ उडाली. मात्र यात सुदैवाने कुणी जखमी झाले नाही.
जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावाजवळ असलेल्या विमानतळ येथे एका प्रशिक्षणार्थ विमान धावपट्टीवरून घसल्याची घटना आज १९ जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. जळगाव विमानतळावर ‘न्यू फ्लाइंग ट्रेनिंग इन्सिट्यूट’ प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून विमान प्रशिक्षण दिले जाते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे व्हीटी-एलएवाय हे विमान धावपट्टीवरून उड्डाण घेत असताना विमानाच्या पुढील बाजूला असलेला लँडिंग गियर निखळल्याने हे विमान धावपट्टीवर आदळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
विमान घसरल्याने काही काळ परिसरात गोंधळ उडाला. मात्र तातडीने उपस्थित तंत्रज्ञांनी धाव घेत यातील प्रशिक्षणार्थींनी बाहेर काढले. दरम्यान, या घटनेत कुणाला दुखापत झालेली नाही अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी दिली आहे.