रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रावेर तहसील कार्यालयाच्या आवारातून दिवसाढवळ्या जप्त केलेली ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्या गौण खनिज माफियांना पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून ट्रॅक्टर पळवणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली असून या कारवाईमुळे अवैध वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

दोन दिवसांपूर्वी अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा घालण्यासाठी मंडळ अधिकारी अनंता खवले व तलाठी महेंद्र चौधरी हे निंभोरा ते वाघोदा रस्त्यावर गस्त घालत होते. यावेळी दसनूर फाट्याजवळ विनापरवाना गौण खनिज घेऊन जाणारी दोन ट्रॅक्टर महसूल पथकाने पकडली होती. ही दोन्ही वाहने जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी तहसील कार्यालयाच्या आवारात लावून ठेवण्यात आली होती. मात्र कायद्याची कसलीही भीती न बाळगता ट्रॅक्टर चालक संदीप कोळी व महेंद्र तायडे यांनी भरदुपारी तहसील कार्यालयातून ही ट्रॅक्टर पळवून नेली होती. सुमारे ३ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल पळवल्या गेल्याने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता रावेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवत दोन्ही पळवलेली ट्रॅक्टर जप्त केली असून आरोपी संदीप कोळी आणि महेंद्र तायडे यांना अटक केली आहे. रावेर तालुक्यातून वाहणाऱ्या तीन प्रमुख नद्यांच्या पात्रातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा व वाहतूक होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. महसूल कर्मचारी जीव मुठीत धरून कारवाई करतात मात्र माफियांकडून त्यांचा पाठलाग होण्याचे प्रकार घडत आहेत. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी रावेरमधील या गंभीर प्रकाराकडे स्वतः लक्ष देऊन वाळू माफियांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे. तसेच रावेर शहरातून रात्रीच्या वेळी होणाऱ्या अवैध वाहतुकीवर पोलीस निरीक्षकांनी कठोर कारवाई करावी अशीही मागणी आता जोर धरू लागली आहे.



