चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सांगवी गावात काहीही कारण नसताना दोन जणांना लाकूड आणि लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना ३जून रोजी दुपारी ३.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी बुधवार ५ जून रोजी दुपारी २.३० वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, किरण परशराम गायकवाड रा. सांगवी ता. चाळीसगाव हा तरुण कुटुंबासह वास्तव्याला असून ट्रॅक्टर चालक म्हणून तो आपला उदरनिर्वाह करतो. ३ जून रोजी दुपारी ३.३० वाजता काही कारण नसताना गावात राहणारे श्याम सोनवणे, सचिन मोरे, अभिषेक मोरे आणि सचिन सोनवणे सर्व रा. सांगवी ता. चाळीसगाव या चौघांनी किरण गायकवाड याला लाकडी दांडा आणि लोखंडी मारहाण केली. त्यावेळी शरद आनंदा सोनवणे हा भांडण सोडवण्यासाठी आला असता त्याला देखील मारहाण केली. या मारहाणीत किरण गायकवाड आणि शरद सोनवणे हे दोघे जखमी झाले आहे. त्यांना चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी बुधवार ५ जून रोजी दुपारी २.३० वाजता मारहाण करणारे चौघांवर चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण सपकाळे करीत आहे.