मुंबई-वृत्तसेवा । महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजप व महायुतीवर जोरदार टीका केली. राज्यातील राजकारण “शिशारी आणणारे” असल्याचे म्हणत त्यांनी येथे “गुलामांचा बाजार भरलेला” असल्याचा आरोप केला.

राऊत म्हणाले की, “आज माणसाच्या मताला, विचारांना आणि जगण्यालाही किंमत उरलेली नाही. सगळं काही पैशाने तोडलं जात आहे.” त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधत, “भाजपचे मांडलिक राजे स्वतःला राज्याचे राजा समजत आहेत,” असा टोला लगावला.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अलीकडे केलेल्या वक्तव्यांचा संदर्भ देत राऊत म्हणाले की, दोघांच्या विचारांची दिशा सारखीच आहे. “महाराष्ट्र दिल्लीच्या दोन बादशाहांची गुलामी कधीही पत्करणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील आगामी राजकीय समीकरणांवर बोलताना राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवर भाष्य केले. “शरद पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडतील असा विचार का केला जातो? उलट अजित पवार शरद पवारांसोबत महाविकास आघाडीत येतील, असा विचार का होत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्यांनी दावा केला की, “अजित पवार सध्या महायुतीत असले तरी त्यांनी महाविकास आघाडीसोबत पाट लावलेला आहे. दोन दगडांवर पाय ठेवता येत नाही; अखेरीस त्यांना एक निर्णय घ्यावाच लागेल.”
सोलापूरमध्ये दोन शिवसेना गट एकत्र लढणार असल्याच्या चर्चेबाबत राऊत म्हणाले की, “अशी कोणतीही अधिकृत माहिती माझ्याकडे नाही. उद्धव ठाकरे यांनी असा निर्णय घेतल्याची माहिती नाही आणि ते घेतील असे वाटत नाही.”
सिंचन घोटाळ्याच्या मुद्द्यावर भाजपकडून अजित पवारांना लक्ष्य केल्याबाबत विचारले असता राऊत म्हणाले, “मेलं मेंढरू आगीला भीत नाही.” त्यांनी पुढे प्रश्न केला की, “भाजपनेच अजित पवारांना क्लीनचिट दिली, मग आता आरोप कोणत्या तोंडाने केले जात आहेत?”
छगन भुजबळ प्रकरणाचा उल्लेख करत राऊत म्हणाले की, “भुजबळ अडीच वर्ष तुरुंगात होते आणि अखेरीस निर्दोष ठरले. त्यामुळे गृहखात्याने आणि ईडीने प्रायश्चित घ्यायला हवं.”
“जोपर्यंत भाजप सत्तेत आहे, तोपर्यंत अनेक नेते मनाने, तनाने आणि धनाने भाजपसोबत असतील. मात्र सत्ता बदलली की तेच नेते महाविकास आघाडीकडे वळतील,” असा दावा करत राऊत यांनी राज्यातील राजकीय घडामोडींना नवी दिशा मिळण्याचे संकेत दिले. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर राऊत यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.



