अमळनेर (प्रतिनिधी) बहुजन समाजाला बाबासाहेबांमुळे फुले कळले, फुलेमुळे शिवराय कळले ही एक साखळी आहे. ही साखळी तमाम बहुजनांनी समजून घेणे काळाची गरज आहे. महामानवांनी सांगितले आहे की, पुस्तकांची विचारांची पूजा घरोघर होणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ज्यांच्या घरी नाही पुस्तकाचे कपाट, त्यांचे घर सपाट. म्हणून युवकांनी थोर पुरुषांची पुस्तके वाचून जयंती साजरी केली तर खऱ्या अर्थाने त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचतील, असे देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये अध्यक्षीय भाषणातून शाळेचे ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के मार्गदर्शन करताना बोलत होते.
श्री.सोनटक्के पुढे म्हणाले की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेला गेले असता रात्री आपल्या खोलीत अभ्यास करत होते. संयोजक खोलीवर येऊन म्हणाले ‘गांधी झोपले, नेहरू झोपले तुम्ही जागे का? बाबासाहेबांनी उत्तर दिले,’ गांधी, नेहरूंचा समाज जागा आहे. म्हणून ते झोपले आहेत माझा समाज झोपलेला आहे म्हणून मी जागा आहे. आयुष्यभर तुमच्या-आमच्यासारखे जागी राहून समाजाला जागृत करणारे बाबासाहेब आंबेडकर तरुणांना समजावेत पुस्तकांसाठी घर विकणारे आणि पुस्तकांसाठी घर बांधणारे बाबासाहेब आम्हाला कळणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्री.सोनटक्के यांनी केले.
१४ एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती देवगांव देवळी ता.अमळनेर येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कुलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे जेष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे शिक्षक आय.आर.महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक एच.ओ. माळी ,एस के महाजन शिक्षकेतर कर्मचारी संभाजी पाटील गुरुदास पाटील यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन एस.के.महाजन यांनी केले.