बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेंना मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गेल्या दोन वर्षांपासून तुरूंगात असलेले बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना जामीन मंजूर झाला आहे. देशमुख यांच्यासह अन्य आरोपी जामिनावर बाहेर आहेत, त्यामुळे सचिन वाझे यांनीही जामिनासाठी याचिका केली होती.

सचिन वाझे यांना मनसूख हिरेन हत्याकांड व उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थानालगत स्फोटकांनी भरलेली कार पार्क केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर महानगरातील रेस्टॉरंट व बारमधून दरमहा 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता.

या प्रकरणातही सचिन वाझे यांचे नाव आले होते. तेव्हापासून ते तुरुंगात होते. दरम्यान, खंडणीच्या गुन्ह्यात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना विशेष सीबीआय न्यायालयाने गेल्यावर्षीच जामीन दिला होता. परंतु, इतर दोन गुन्ह्यांत आरोपी असल्याने त्यांचा तुरुंगवास लांबला. मे महिन्यांत त्यांनी पुन्हा अर्ज करून जामीनाची मागणी केली होती. परंतु, तेव्हाही त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला.

Protected Content