Home क्राईम संसदेसह दिल्लीतील ९ शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी

संसदेसह दिल्लीतील ९ शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी


दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । संसदेला बॉम्बने उडवून देण्यासह राजधानी दिल्लीतील नऊ शाळांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने देशाच्या राजधानीत एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी प्राप्त झालेल्या या धमकीच्या मेलमुळे सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाल्या असून संसद परिसरासह शाळा आणि संवेदनशील भागांमध्ये कडेकोट बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या ई-मेलमध्ये १३ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजून ११ मिनिटांनी संसदेमध्ये मोठा स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच दिल्लीला खलिस्तान बनवण्याचा उल्लेख करत अफजल गुरुच्या नावाचा संदर्भ देण्यात आला आहे. संसदेसोबतच राजधानीतील नऊ शाळांमध्येही बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा इशारा या मेलमध्ये देण्यात आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

धमकीचा मेल मिळताच संबंधित शाळांच्या सुरक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली. दिल्ली फायर सर्व्हिसकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी दिल्लीतील विविध भागांमधील शाळांकडून इमर्जन्सी कॉल प्राप्त झाले. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्क्वॉडसह पथके तातडीने शाळांच्या परिसरात दाखल झाली असून सखोल तपासणी सुरू आहे.

दिल्ली फायर सर्व्हिसने सांगितले की, आतापर्यंत नऊ शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्येक शाळा आणि परिसराची कसून तपासणी केली जात असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. कोणताही संशयास्पद प्रकार आढळून आल्यास तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या धमकीच्या मेलमध्ये “अफजल गुरुच्या आठवणीसाठी दिल्ली खलिस्तान बनेल”, “१३ फेब्रुवारी रोजी १:११ मिनिटांनी संसदेमध्ये मोठा धमाका होईल”, “पंजाब खलिस्तान आहे” आणि “खलिस्तान नॅशनल आर्मी” अशा आशयाचा मजकूर असल्याचे सूत्रांनी सांगितले. या गंभीर स्वरूपाच्या धमकीमुळे केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनीही तपासात उडी घेतली आहे.

मेल प्राप्त होताच सायबर विभागाच्या मदतीने त्याचा स्रोत शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ई-मेलचे लोकेशन, आयपी अ‍ॅड्रेस आणि पाठवणाऱ्याची ओळख पटवण्यासाठी तांत्रिक तपास सुरू असून दिल्लीतील सर्व संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.


Protected Content

Play sound