दिल्ली वृत्तसंस्था | दिल्ली येथील ‘गाझीपूर फूल मार्केट’ येथे एका बॅगमध्ये आयईडी बॉम्ब आढळून आल्याने खळबळ उडाली असून हा बॉम्ब वेळीच डिफ्यूज करण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलीसांसह सुरक्षा यंत्रणा कसून तपास करत आहेत.
याविषयी अधिक माहिती अशी की, “दिल्ली येथील गाझीपूर फुल बाजारात एक बेवारस बॅग असल्याची माहिती अकरा वाजेच्या सुमारास पोलीस यंत्रणेला प्राप्त झाली होती. त्यानंतर लागलीच पोलीस पथकाने धाव घेत बॉम्ब शोधक आणि नाशक पथकासह अग्नीशमन दलास बोलविले.
पोलिसांनी तपास केला असता बॅगमध्ये आयईडी बॉम्ब असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर एनएसजीच्या टीमने मोकळ्या जागेत ८ फूटाचा खोल खड्डा खोदून त्या खड्ड्यामध्ये बॉम्बचा नियंत्रित स्फोट घडवून आणला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बॉम्ब निष्क्रिय करण्यासाठी हा कंट्रोल ब्लास्ट करण्यात आला.
घटनास्थाळी एफएसएलच्या टीमला देखील बोलवण्यात आले. एफएसएलच्या टीमने कसून तपास केला असून पुरावे गोळा करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात आरडीएक्स आणि अमोनियम नायट्रेट वापरण्यात आल्याचे समोर आले असून याचा अर्थ दिल्लीत मोठे कट कारस्थान रचण्यात आले होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बॉम्बमुळे मोठी जिवीतहानी होण्याची शक्यता होती.
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार बॅगमध्ये आयईडीबरोबर टायमर सेट करण्यात आला होता. गाझीपूर फुल मंडईच्या गेट क्रमांक एकमधून प्रवेश केल्यानंतर आतमध्ये एक मोठा कॅमेरा लावण्यात आलेला आहे. ज्यामध्ये बॉम्ब ठेवणाऱ्याचा चेहरा कैद झाल्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल याचा तपास करत आहे.