भरदिवसा धाडसी चोरी! पत्रकाराच्या घरातून सोने, चांदी आणि रोकड लंपास

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील महाबळ रस्त्यावर असलेल्या अरुंधती अपार्टमेंटमध्ये आज, गुरुवार १० एप्रिल रोजी भर दिवसा धाडसी चोरीची घटना घडली आहे. पब्लिक लाईव्ह पोर्टलचे संपादक काशिनाथ चव्हाण यांच्या घरात चोरट्यांनी कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज लंपास केला आहे. दुपारी १ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, रामानंद नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काशिनाथ चव्हाण हे आपल्या कुटुंबासह मायादेवी मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या अरुंधती अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर राहतात. आज दुपारी १ वाजता त्यांची पत्नी दोन्ही मुलांना घेऊन अपार्टमेंटजवळच्या ब्युटी पार्लरमध्ये गेल्या होत्या. या दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील घराचे कुलूप तोडले आणि घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेली ७ ग्राम वजनाची सोन्याची चैन, ५ भार वजनाचे चांदीचे ब्रासलेट आणि ८५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून चोरटे फरार झाले.

अर्ध्या तासानंतर चव्हाण यांच्या पत्नी घरी परतल्यावर त्यांना घराचा दरवाजा उघडलेला दिसला. घरात प्रवेश करताच त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ रामानंद नगर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील नागरिकांकडून माहिती घेण्यास सुरुवात केली असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. भर दिवसा घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Protected Content