
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहराला हादरवून टाकणाऱ्या घटनेत, देवी विसर्जनासाठी गिरणा नदीत उतरलेला हेमेश संतोष पाटील (वय १८, रा. दादावाडी परिसर, जळगाव) या तरुणाचा मृतदेह तब्बल २० दिवसांनंतर आढळून आला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पाळधीजवळील दोनगाव शिवारात हा मृतदेह गुरुवारी (२३ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजेच्या सुमारास आढळून आला. या घटनेची नोंद पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
निमखेडी शिवारातील रेल्वे पुलाजवळ आणि बांभोरीच्या दिशेने असलेल्या गिरणा नदीत शुक्रवार, ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता ही दुर्दैवी घटना घडली होती. हेमेश आपल्या मित्रांसोबत देवी मातेच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेला होता. विसर्जन केल्यानंतर पाय घसरल्यामुळे तो अचानक नदीपात्रात वाहून गेला.
हेमेश हा त्याच्या आई आणि जुळ्या भावासह राहत होता. घटनेनंतर तात्काळ महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य सुरू केले. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने व २० दिवसांचा कालावधी उलटल्याने तो सापडला नव्हता.
अखेर, घटनेच्या २० दिवसानंतर गुरुवारी (२३ ऑक्टोबर) दुपारी पाळधीजवळील दोनगाव शिवारात गिरणा नदीकाठी गुरे चारणाऱ्या व्यक्तींना एका तरुणाचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी तातडीने पाळधी दूरक्षेत्र पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि ओळख पटवून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (GMCH) हलवण्यात आला आहे.



