बोदवड प्रतिनिधी । बोदवड ते जुनोना रेल्वे पुलाजवळ अज्ञात ५ जणांनी पतीला जीवे ठार मारण्याची धमकी देत विवाहितेच्या अंगावरील सोन्याचे मंगळसुत्रासह दोन मोबाईल व रोकड असा एकुण ३२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जबरी चोरून नेला. बोदवड पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, राहूल विलास घेटे (वय-२५) रा. चोरवड ता. रावेर हे शेती करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. १८ जून रोजी सकाळी ११ वाजता उजनी शिवारात बोदवड ते जुनोना रोडवर असलेल्या रेल्वे पुलाजवळ राहूल घेटे हे पत्नीसह शेतात काम करत होते. त्यावेळी अज्ञात ५ ते ६ जण येवून राहूल यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. यात पत्नीच्या अंगवारील १० हजार रूपये किंमतीची मंललपोत आणि १६ हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल आणि ५ हजार ३५० रूपयांची रोकड असा एकुण ३२ हजार ३५० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी राहूल घेटे यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाईदास मालचे करीत आहे.