बोदवड प्रतिनिधी । येथील नगरपंचायतमध्ये टेंडरच्या वादातून नगरसेवक एकमेकांना भिडून धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. मलिद्याच्या वादातून हा प्रकार घडला असून यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, येथील स्मशानभूमिच्या सुशोभीकरणासाठी २ कोटी ४० लाख रूपयांची निविदा काढण्यात आली आहे. ही निविदा आपल्या समर्थकाला मिळावी यासाठी काही नगरसेवकांची मोर्चेबांधणी करून ठेवल्याची चर्चा आधी देखील रंगली होती. यात मूळ रकमेच्या ११, १७, १९ आणि २१ टक्के कमी मूल्याच्या निविदा भरण्यात आल्या. परिणामी नियमानुसार २१ टक्के कमी रक्कम असणार्या ठेकेदाराची निविदा संमत करण्यात आली.
यामुळे नगरसेवकांच्या एका गटामध्ये प्रचंड वाद झाले. यातून काही जणांनी एकमेकांना पकडून धक्काबुक्की केल्यामुळे नगरपंचायतीच्या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. हा प्रकार घडला तेव्हा मुख्याधिकारी आपल्या कॅबिनमध्ये नव्हते. तथापि, हा गोंधळ सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. या संदर्भात मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली आहे.
दरम्यान, निविदेच्या माध्यमातून मिळणार्या मलिद्यासाठी नगरसेवक एकमेकांना भिडल्याने शहरासह परिसरात याबाबतच एकच चर्चा सुरू असल्याचे दिसून आले.