बोदवड- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर नगराध्यक्ष निवडीच्या आधी येथील शिवसेनेचे नगरसेवक सहलीवर रवाना झाले आहेत. तर या पदावर कोण विराजमान होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने बहुमत संपादन केले आहे. १९ जानेवारीला लागलेल्या निकालात शिवसेनेने १७ पैकी ९ जागांसह विजय संपादन करून सत्ता हस्तगत केली आहे. यानंतर आता नगरपंचायतीची धुरा कुणाकडे येणार ? अर्थात, नगराध्यक्ष कोण होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
दरम्यान, १८ फेब्रुवारीला नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवड होणार आहे. यासाठी दुपारी १२ वाजता पालिकेत विशेष सभा होईल. पीठासीन अधिकारी प्रांत रामसिंग सुलाने राहणार आहेत. दरम्यान, नगराध्यक्ष निवडीच्या आधी शिवसेनेचे नगरसेवक सहलीस रवाना झाले आहेत नगराध्यक्ष पदासाठी १४ फेब्रुवारीला सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज भरता येईल. नंतर छाननी होऊन वैध व अवैध उमेदवारांची नावे प्रसिद्ध होतील.१७ फेब्रुवारीला माघार घेता येईल. यानंतर १८ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता विशेष सभा होईल.
अर्थात, नगराध्यक्षपदासाठीचे नाव हे अर्ज माघारीची मुदत उलटून गेल्यानंतर लागलीच स्पष्ट होणार आहे. या पदासाठी शिवसेनेतर्फे सईद बागवान व आनंदा पाटील या दोघांची नावे स्पर्धेत असून यापैकी नगराध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे आता लक्ष लागले आहे.