बोदवड प्रतिनिधी | शाब्दीक वादातून तालुक्यातील दोन राजकीय पदाधिकार्यांनी एकमेकांच्या विरूध्द पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत वृत्त असे की, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास पाटील यांच्याबद्दल अकबर जलील मुलतानी यांच्याजवळ अपशब्द काढले. यावरून रामदास पाटील यांनी त्यांना जाब विचारला असता शाब्दिक बाचाबाची होऊन वाद थेट पोलिस ठाण्यात पोहोचला. यामुळे दोन्ही बाजूच्या समर्थकांनी पोलीस स्थानकात गर्दी केली.
जिल्हा बँकेच्या संचालिका रोहिणी खडसे यांनी पोलिस ठाण्यात येऊन पोलिस निरीक्षकांशी चर्चा केली. त्या तासभर तेथे थांबून होत्या. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या दालनात प्रा. पाटील व पाटील यांच्यात मनोमिलनाचा प्रयत्न झाला. मात्र त्यात अपयश आल्याने दोघांनी परस्परविरोधी फिर्याद दिली. यानुसार दोघांनी एकमेकांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आली. शेवटी रात्री उशीरा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी दोघांमध्ये मनोमीलन घडवून आणले. पण या प्रकारामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात वातावरण तापल्याचे दिसून आले.