जळगाव (प्रतिनिधी) सध्याच्या दुष्काळाचे संकट, दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची कारणे, यामुळे सर्वसामान्यांसह भरडला जाणारा शेतकरी, पाण्यासाठी होणारे स्थलांतर यासह विविध सामाजिक प्रश्नांवर भाष्य करीत पाणी बचतीचा संदेश देणाऱ्या नाटीका आणि गीतांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्यथांवर फुंकर स्वरसंगीनी गृपच्या कलावंतांनी घातली.
गांधी रिसर्च फाऊंडेशन, भवरलाल एण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, नीर फाऊंडेशन, जलश्री आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. च्या संयुक्त विद्यमाने आयोजीत जलसप्ताहानिमित्त स्वर संगीनी गृपमधील कलावंतांनी सादरीकरण करून रसिकांची दाद मिळविली. ‘बळीराजाचा संसार त्याला शेतीचा आधार…’, ‘कोरड्या विहीरीमधी डोकावतेय माजी माय…’, ‘पड रे पाण्या…’, ‘नदी सुकली विहीर आटली’, ‘अरे मेघा अरे मेघा’ यासारखे प्रबोधनात्मक गाणी स्वराज्य सामाजिक आणि सांस्कृतिक निर्मित स्वर संगीनी गृपमधील चंद्रकांत इंगळे, विनोद पाटील, बुद्धभुषण मोरे, वर्षा उपाध्ये, नेहा पवार, करण माळकर, हर्षा शर्मा, कुलदीप भालेराव, कृष्णा सोनवणे, साबिर खान, आरती धाडी, विजय पोश्ते, निलेश लोहार कलावंतांनी सादर केलीत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन जैन इरिगेशनचे सहकारी दिनेश दीक्षित यांनी केले.
… अन रसिकांचे डोळे पाणावले
पाणी म्हणजे नवनिर्मितीचे साधन मात्र पाण्याचा अपव्यय आणि वृक्षांची कत्तल यामुळे ओढविलेली दुष्काळाची परिस्थिती. यात सावकारी पाशात आणि कर्जाच्या पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येसारख्या संवेदनशील प्रश्नांवर कलावंतांनी नाटिका सादर केली. यातुन कर्जाच्या ओझ्याखाली आणि शासनाच्या तोडक्या मदतीसाठी आत्महत्या न करण्याचे प्रबोधन करण्यात आले. ही नाटीका पाहतांना रसिकांचे डोळे पाणावले.
पथनाट्याद्वारे आज जलजागृती
जलसप्ताहामध्ये विविध उपक्रमांच्या माध्यामातून जल प्रबोधन करण्यात येत आहे. यात आज दि.१८ मार्च ला विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडीयम स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल, नुतन मराठा विद्यालय आणि अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थी पथनाट्य सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशन, भवरलाल एण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, नीर फाऊंडेशन, जलश्री आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. यांच्यावतीने करण्यात आले आहे.