पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील लोहारी बु” गृप ग्रामपंचायती मधील महत्वाचे जुने रेकॉर्डमध्ये खाडाखोड करत असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने ग्रामपंचायत व गावाच्या हितार्थ ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयास कुलुप ठोकल्याची घटना आज दि. २२ आॅगस्ट रोजी घडली आहे. सरपंच पती यांनी केलेल्या या कृत्याची सखोल चौकशी व्हावी म्हणून ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवकासह तहसिलदार, गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
लोहारी बु” ता. पाचोरा गृप ग्रामपंचायतीचे जुने परंतु महत्वाचे रेकॉर्ड जागे अभावी वि. का. सोसायटी कार्यालयात ठेवण्यात आले होते.आज दि. २२ आॅगस्ट रोजी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच रंजनाबाई प्रविण पाटील यांचे पती प्रविण नामदेव पाटील हे वि. का. सोसायटी कार्यालयात जावुन ग्रा. पं. सफाई कामगार कडुबा खरात यांच्या मदतीने पडदीवर ठेवलेले जुने मात्र महत्वाचे रेकॉर्ड खाली उतरुन रेकाॅर्ड मध्ये खाडाखोड करत असतांनाच गावातील यशोदिप समाधान पाटील हे त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त वि. का. सोसायटीत गेले असता त्यांनी प्रविण पाटील यांना काय प्रकार आहे ? अशी विचारणा केली असता प्रविण पाटील यांनी मी मालक आहे मी काहीही करेन असे सांगितल्यावर यशोदिप पाटील यांनी ग्राम विकास अधिकारी संतोष शिवणेकर यांना भ्रमणध्वनी द्वारे कल्पना दिली असता संतोष शिवणेकर हे बाहेर गावी असल्याने यशोदिप पाटील यांनी ग्रामपंचायती सोबतच गावाचे नुकसान होवु नये तसेच अजुन काही महत्त्वाचे रेकाॅर्डयध्ये छेडछाड होवु नये म्हणुन ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने थेट ग्रामपंचायत कार्यालयास कुलुप ठोकले आहे.
तसेच याप्रकाराची सखोल चौकशी व्हावी या मागणीसाठी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांना शरद पांडुरंग पाटील, सतिष जगन खैरनार, चिंधा श्रीपत बडगुजर, बेबाबाई समाधान पाटील, सुनिता रामचंद्र पाटील, मेहबुबा बी हैदर मुसलमान यांच्या सह्या असलेले निवेदन देण्यात आले आहे. या प्रकरणी प्रशासन काय चौकशी करते याकडे लोहारी ग्रामस्थांसह सर्वांचे लक्ष लागुन आहे.