Home प्रशासन मुक्ताईनगरात घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार सुरू ; तहसील प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

मुक्ताईनगरात घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार सुरू ; तहसील प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर आणि काळाबाजार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे समोर येत असून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे हा धंदा दिवसेंदिवस वाढत असल्याची चर्चा सुरू आहे. विशेषतः बऱ्हाणपूर रोड परिसरात आणि तालुक्यातील काही भागांमध्ये सिलेंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरण्याचा प्रकार उघडपणे सुरू असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

माहितीनुसार, शहरातील काही दुकानांमध्ये तसेच गॅरेजमध्ये घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडरमधून थेट वाहनांमध्ये गॅस भरला जात असल्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. हा प्रकार अत्यंत धोकादायक असून कोणत्याही क्षणी मोठा स्फोट किंवा अपघात होण्याची शक्यता असल्याची भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र एवढ्या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची चर्चा शहरात रंगत आहे.

बऱ्हाणपूर रोड परिसरात दिवसाढवळ्या हा अवैध व्यवसाय सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अनेक ठिकाणी सिलेंडरचा साठा करून वाहनांमध्ये गॅस भरला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याचे नागरिक सांगत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सिलेंडरचा साठा केला जात असताना हे सिलेंडर नेमके कुठून येतात आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी तहसीलदारांनी एका न्यूज चॅनलच्या माध्यमातून गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराविरोधात कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरात उघडपणे सुरू असलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल नाराजी वाढताना दिसत आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरू शकणारा हा प्रकार तात्काळ थांबवण्यासाठी प्रशासनाने धडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मुक्ताईनगरात सुरू असलेल्या गॅस सिलेंडरच्या अवैध धंद्यावर तहसील प्रशासन नेमकी कारवाई कधी करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound