मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | रविवारी उशिराने भाजपाने तीन उमेदवार दिले, असून कोल्हापुरात माजी खा. धनंजय महाडिक यांना तिसरा उमेदवार जाहीर केला आहे. या तिसऱ्या उमेदवारामुळे शिवेसेनेसाठी डोकेदुखी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सहा उमेदवार निवडून जाणार आहेत. यात भाजपचे २, महाविकास आघाडीतील प्रत्येकी एक तर शिवसेनेच्या वाट्याला आलेली दुसरी जागा असे सहा जागांचे गणित स्पष्ट होते. भाजपचे ८४ आमदाराची मते वगळता उरलेले आमदारांची मते आणि अपक्ष या जोरावर भाजपाने व्यूहरचना करीत शिवसेनेला धक्का दिला आहे. भाजपने रविवारी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे आणि कोल्हापूरचे माजी खा. धनंजय महाडिक या तीन उमेदवाची नावे महाविकास आघाडी आणि विशेषत: शिवसेनेची कोंडी करण्याच्या दृष्टीने व्यूहरचना आखून जाहीर केली. राजकीय आरक्षण रद्द झाल्याने भाजपने इतर मागासवर्ग समाजाला (ओबीसी) आपलेसे करण्याचा प्रयत्न करीत डॉ. बोंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवाय तिसरा उमेदवार भाजपाने दिल्याने अपक्ष उमेदवारांच्या जोरावर दुसरा उमेदवार निवडून आणण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या शिवसेनेला एकप्रकारे त्यांचा दुसरा उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान असणार आहे.
विदर्भातून अमरावती जिल्ह्याचे मोर्शी येथील माजी आ. डॉ. अनिल बोंडे यांना भाजपाने दुसऱ्या जागेसाठी उमेदवारी दिली कुणबी समाजातील डॉ. बोंडे यांना उमेदवारी देऊन भाजपाने ओबीसी समाजाचे कार्ड वापरले आहे. तर कोल्हापूरचे संभाजीराजेना शिवसेनेने अपक्ष म्हणून पाठींब्यास नकार देत कोल्हापूरच्या संजय पवार यांना उमेदवारी दिली. म्हणूनच भाजपानेही कोल्हापूरातून माजी खा.धनंजय महाडिक यांना तिसरे उमेदवार जाहीर करीत रिंगणात उतरविले असून रात्री उशिरा कोल्हापूरचे माजी खा. धनंजय महाडिक यांच्या नावाची घोषणा केली.
राज्यसभेला एका उमेदवाराला पहिल्या पसंतीची किमान ४१ मते आवश्यक आहेत आणि भाजपाचे १०६ आमदारांसह पक्षाकडे २२ अतिरिक्त मते आहेत. आणि हे गणित लक्षात घेत माजी खा. धनंजय महाडिक यांना तिसरा उमेदवार म्हणून पुढे केले आहे.
शिवसेनेची मतांची जुळवाजुळव स्वत: व राष्ट्रवादीची अतिरिक्त मते तसेच अपक्षांवर आहे. आणि भाजपाच्या तिसऱ्या उमेदवाराच्या विजयासाठी अपक्ष किंवा छोटय़ा पक्षांच्या मतांच्या आधारे मतांची जुळवाजुळव करण्यावर भाजपाचा भर आहे. भाजपला केवळ १२ मतांची आवश्यकता आहे. भाजपाच्या तिसऱ्या उमेदवाराला अपक्षांची मते भाजपाकडे वळल्यास शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचे भवितव्य कठीण असून शिवसेनेपुढे दुसरा उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.