भाजपचे पाणीटंचाईसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

वरणगाव ता.भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वरणगाव शहरातील नागरिकांना दहा ते पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. २०१९ मध्ये मंजूर झालेली २५ कोटींची २४x७ पाणीपुरवठा योजना अद्याप पूर्ण न झाल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या संदर्भात भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांची भेट घेऊन ३१ मार्चच्या आत नवीन पाणी योजना कार्यान्वित करण्याची मागणी केली. अन्यथा, २ एप्रिल रोजी नगरपरिषदेत जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

२०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी २५ कोटी रुपयांची २४x७ पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली होती. मात्र, विविध तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळ्यांमुळे अद्यापही ही योजना पूर्ण झालेली नाही. या योजनेसाठी वारंवार आंदोलने, जलसमाधी, रस्ता रोको आणि मोर्चे काढण्यात आले.

माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, कामगार नेते मिलिंद मेढे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात मुख्याधिकारी सचिन राऊत यांच्या हलगर्जीपणामुळे पाणी योजना पूर्ण होत नसल्याचा आरोप केला आहे. तसेच, कठोरा नदीपात्रात जॅकवेल मंजूर करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची मागणी करण्यात आली आहे. याआधीही १५ फेब्रुवारीच्या आत नवीन योजनेचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तापी नदीच्या पाण्यावर हात ठेवून मुख्याधिकारी सचिन राऊत यांनी प्रतिज्ञा केली होती. मात्र, प्रत्यक्षात अद्यापही नागरिकांना नियमित पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी ३१ मार्चपर्यंत ही समस्या निकाली काढण्याची मागणी केली आहे.

भाजपच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी तत्काळ जिल्हा प्रशासन अधिकारी जनार्दन पवार आणि इतर अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. त्यांनी मंजूर अंदाजपत्रकानुसार कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच, नवीन वाढीव योजना न घेता मंजूर योजनेतूनच सर्व कामे त्वरित पूर्ण करावीत, असे निर्देश दिले.

प्रतिभा नगर, विकास कॉलनी आणि पवन नगर येथे जलकुंभ मंजूर झाले असले तरी जागेच्या अभावामुळे त्यांचे बांधकाम रखडले आहे. भविष्यात या भागांमध्ये मोठी पाणीटंचाई जाणवू शकते. त्यामुळे पर्यायी जागा शोधून जलकुंभ बांधण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, पवन नगरकडे जाणाऱ्या सहा किलोमीटर जलवाहिनीचे काम सुरू करण्याची गरज असल्याचे भाजप शिष्टमंडळाने सांगितले. या संपूर्ण परिस्थितीवर तोडगा न निघाल्यास २ एप्रिल रोजी नगरपरिषदेसमोर मोठे जनआंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा भाजप नेत्यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनाही ईमेलद्वारे पाठवण्यात आल्या आहेत.

<p>Protected Content</p>