अमळनेर प्रतिनिधी । ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील वीजपुरवठा पूर्वसूचना न देता खंडीत केल्याबद्दल आघाडी सरकारचा निषेध करून वीजपुरवठा पुर्ववत सुरळीत करण्यासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना निवेदन देण्यात आले आहे.
आघाडी सरकारच्या शेतकऱ्यांना जाचक ठरणाऱ्या निर्णयातून कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या शेतीची वीज कनेक्शन तोडण्यात येत आहेत.आज रोजी शेतकऱ्यांच्या शेतात रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची गरज असताना येन हंगामाच्या तोंडावर पीक हाताशी आले असताना आघाडी सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर जाचास सामोरे जावे लागत आहे.आम्ही विजबिलावरील इतर आकार व व्याज माफ करून थकलेले बिल भरण्यासाठी सवलत देऊ असे आघाडी सरकारने सांगितले होते.
परंतु सवलत देणे दूरच उलटपक्षी वीज कनेक्शन कट करून आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत आहे का शेतकऱ्यांच्या कानपिळी साठी हा सवाल शेतकरी विचारत आहेत. सदर निर्णयामुळे कोणतीही पूर्वसूचना न देता गहू, हरभरा इत्यादी पीक शेतात उभे असताना संपूर्ण डी.पी.बंद करून नाहक शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे. अश्याच प्रकारे कोणतीही पूर्वसूचना न देता घरगुती तसेच शेती उपयुक्त वीज कनेक्शन तोडून सर्व वीज ग्राहकांना त्रास दिला जात आहे. कोणतीही बाब लक्षात न घेता निम्मी वीजबिल भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावला जात आहे. आघाडी सरकारने चालवलेली ही सर्वत्र फसवेगिरी आहे. शेतकऱ्यांना जाणूनबुजून त्रास देण्यासाठी आघाडी सरकार जबाबदार आहे.
अमळनेर भाजपने आरोप केला असून महाआघाडी सरकारचा सर्वत्र निषेध केला जात आहे.सदर शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास आगामी कालखंडात भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून मोठे व तीव्र आंदोलन करेल व त्या आंदोलनाला राज्यातील हे शेतकरी विरोधी महाआघाडी सरकार जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे निवेदन देते प्रसंगी भाजपा अमळनेर च्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांना सांगितले.
सदर निवेदनावर भाजपचे, ऍड व्ही आर पाटील प्रदेश सदस्य, महेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष, तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे, सरचिटणीस विजय राजपूत, माजी सभापती प्रफुल्ल पवार, महेंद्र बोरसे, शिवाजी राजपूत यावेळी उपस्थित होते.