मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। मुंबई महानगरपालिकेला अखेर महापौर मिळाला असून प्रशासक राज संपुष्टात येत ‘महापौरराज’ सुरू झाले आहे. भाजपच्या रितू तावडे यांनी मुंबईच्या महापौरपदाची सूत्रे स्वीकारली, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे संजय घाडी यांनी उपमहापौरपदाची जबाबदारी स्वीकारली. विरोधात एकही उमेदवार नसल्याने दोघांचीही बिनविरोध निवड झाली. नव्या अधिसूचनेनुसार पालिका आयुक्तांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिल्यामुळे यंदाची निवड प्रक्रिया विशेष ठरली.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकत आघाडी घेतली होती, तर महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्यामुळे महापौरपदावर भाजपचा दावा मजबूत मानला जात होता. त्यानुसार भाजपने रितू तावडे यांचे नाव अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले, तर शिंदे गटाने संजय घाडी यांना उपमहापौरपदासाठी उमेदवारी दिली. संख्याबळ अपुरे असल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. परिणामी विरोधात एकही अर्ज न आल्याने तावडे आणि घाडी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. आज पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते त्यांनी औपचारिकरित्या पदभार स्वीकारला.

या निवडीमुळे रितू तावडे या भाजपच्या मुंबईतील दुसऱ्या महापौर ठरल्या आहेत. यापूर्वी १९८२ साली प्रभाकर पै यांनी भाजपच्या वतीने महापौरपद भूषवले होते. तब्बल चार दशकांनंतर भाजपला पुन्हा मुंबईत महापौरपद मिळाले आहे. विशेष म्हणजे मुंबईच्या इतिहासात भाजपच्या पहिल्या महिला महापौर होण्याचा मानही रितू तावडे यांना मिळाला आहे. घाटकोपरच्या नगरसेविका असलेल्या तावडे यांनी यापूर्वी शिक्षण समितीच्या अध्यक्षा म्हणूनही काम पाहिले आहे.
मुंबई महापालिकेवर ठाकरे गटाची तब्बल २४ वर्षांहून अधिक काळ सत्ता होती. राज्यातील सत्तांतरानंतर मुंबईतील राजकारणातही मोठे बदल झाले. यावेळी ठाकरे गटाला सत्तेपासून दूर व्हावे लागले असून महापालिकेतील त्यांची दीर्घकालीन सत्ता संपुष्टात आली आहे. त्यामुळे मुंबईच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले आहे.
यंदाच्या महापौर निवड प्रक्रियेत नव्या नियमांमुळे विशेष बदल पाहायला मिळाले. पूर्वीच्या नियमानुसार मावळते महापौर किंवा सर्वांत ज्येष्ठ नगरसेवक पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहत असत. मात्र नव्या अधिसूचनेनुसार हा अधिकार प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला देण्यात आला आहे. सध्याचे पालिका आयुक्त भूषण गगराणी हे प्रधान सचिव दर्जाचे अधिकारी असल्याने त्यांनीच पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. मागील सभागृहाचा कार्यकाळ संपून जवळपास तीन वर्षे उलटल्याने ‘मावळते महापौर’ ही संकल्पना लागू होत नव्हती. जुन्या नियमानुसार ठाकरे गटाच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव यांना पीठासीन अधिकारी होण्याची संधी मिळाली असती. मात्र नियमबदलामुळे हा अधिकार थेट प्रशासकीय अधिकाऱ्याकडे गेला. संभाव्य राजकीय तिढा टाळण्यासाठी हा बदल करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महापौर आणि उपमहापौर नियुक्तीच्या वेळी बीएमसी मुख्यालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात दाखल होताच भाजप कार्यकर्त्यांकडून “देवाभाऊ”च्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. त्याला प्रत्युत्तर म्हणून ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी “चोर है, चोर है” अशा घोषणाबाजी केली. काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नंतर वातावरण निवळले असले तरी पुन्हा एकदा मोदी यांच्या नावाने घोषणा झाल्याने विरोधक आक्रमक झाले आणि सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले.



