सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सावदा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये आज छाननीनंतर प्रभाग क्रमांक ७ अ मध्ये अनपेक्षित पण महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे. भाजपाच्या रंजना जितेंद्र भारंबे यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला असून या निकालामुळे सावद्यात भाजपाच्या विजयाचा पहिला बिगुल वाजल्याची भावना व्यक्त होत आहे.

प्रभाग क्रमांक ७ अ मध्ये एकूण तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यात रंजना जितेंद्र भारंबे (भाजपा), हेमांगी राजेंद्र चौधरी (भाजपा) आणि रेखा राजेश वानखेडे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) यांचा समावेश होता. मात्र छाननीदरम्यान हेमांगी चौधरी आणि रेखा वानखेडे यांनी अधिकृत एबी फॉर्म अर्थात पक्षनिशाणी प्रमाणपत्र सादर न केल्याचे आढळले. फॉर्म सादर न केल्याने दोघींचेही अर्ज बाद करण्यात आले.

यामुळे रंजना भारंबे या प्रभागातील एकमेव पात्र उमेदवार ठरल्या असून त्यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारीांकडून अधिकृत घोषणा अद्याप बाकी असली तरी राजकीय तज्ज्ञांच्या मते भाजपाचा प्रभाग ७ अ मधील पहिला विजय निश्चिंत असून या निकालाने पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या विजयाचे स्वागत केले असून पुढील निवडणूक लढतींसाठी हा परिणाम बळ देणारा असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. स्थानिक पातळीवर हा बिनविरोध विजय पक्ष संघटनशक्ती, उमेदवाराची स्वीकारार्हता आणि व्यवस्थापन कौशल्याचे उदाहरण म्हणून पाहिला जात आहे.



