नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महाराष्ट्र आणि हरियाणातील निवडणुकीतील तिकीट वाटपावर आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. निवडणुकीतील तिकीट वाटपासह महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीच्या संदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विजय पुराणिक, व्ही. सतीश हे देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत. भाजपच्या या बैठकीकडे संपूर्ण राज्यासह शिवसेनेचेही लक्ष लागले आहे. सध्या राज्यभरात शिवसेना भाजप युतीची घोषणा कधी होणार, याची चर्चा सुरु आहे. राज्यात शिवसेना भाजपची युती होणार हे दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, अद्याप जागावाटपाचा कोणताही फॉर्म्युला समोर आलेला नाही. जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावरुन दोन्ही पक्षांमध्ये मतभेद असल्याची बोलले जात आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक समिती आणि पंतप्रधान मोदी हे जागावाटप व युतीबाबत काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.