जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 ब मध्ये भाजपाला मोठा राजकीय दिलासा मिळाला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या राजकीय नेतृत्वाला बळ देणारी ही निवडणी ठरली असून अधिकृत उमेदवार उज्वला दीपक तायडे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. प्रभागातील छाननी प्रक्रियेदरम्यान विरोधी उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने त्यांचा मार्ग सुकर झाला.
छाननी दरम्यान विरोधी उमेदवाराचा अर्ज अयोग्य ठरवण्यात आला, ज्यामुळे उज्वला दीपक तायडे या निर्विरोध विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक 11 ब हा जामनेर नगरपालिकेतील प्रभावी आणि चर्चेत राहणारा प्रभाग मानला जातो. या प्रभागात मतदारसंघातील राजकीय समीकरणांनुसार कट्टर स्पर्धा अपेक्षित असताना विरोधी उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने भाजपामध्ये आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उज्वला तायडे या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे या निवडीला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले असून जामनेर शहरात भाजपाचा प्रभाव अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे, अशी प्रतिक्रिया पक्षांतर्गत व्यक्त होत आहे. या विजयानंतर नगराध्यक्ष साधना महाजन, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.



