Home राजकीय चौफेर टीकेनंतर भाजपाची नाचक्की ; स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे यांचा अखेर राजीनामा

चौफेर टीकेनंतर भाजपाची नाचक्की ; स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे यांचा अखेर राजीनामा


बदलापूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । बदलापूर येथील एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाशी संबंधित वादामुळे भाजपाची मोठी अडचण निर्माण झाली असून, या प्रकरणातील सहआरोपी असलेल्या स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून या नियुक्तीवर चौफेर टीका होत होती आणि जनतेत तीव्र संताप व्यक्त केला जात होता.

गतवर्षी ऑगस्ट २०२४ मध्ये बदलापूरमधील एका प्रसिद्ध शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणाने संपूर्ण राज्यासह देशभरात खळबळ उडवली होती. या घटनेतील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्यानंतर, शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांनी हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी त्यांच्यावर पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गंभीर पार्श्वभूमीवरही भाजपाकडून तुषार आपटे यांची स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात तसेच नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मनसेसह विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी या निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. सोशल मीडियावरही भाजपावर जोरदार टीका करण्यात येत होती, ज्यामुळे पक्षाची मोठी नाचक्की झाल्याचे चित्र होते.

दरम्यान, वाढत्या दबावानंतर आज तुषार आपटे यांनी आपल्या स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा बदलापूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे सादर केला. राजीनामा दिल्यानंतर प्रतिक्रिया देताना आपटे म्हणाले की, आपण स्वेच्छेने हा निर्णय घेतला असून, आदर्श विद्यामंदिर शाळा आणि भारतीय जनता पक्षाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी हा राजीनामा दिला आहे. शाळेची आणि पक्षाची बदनामी होऊ नये, हा एकमेव उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या महिन्यात झालेल्या बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाच्या रुचिता घोरपडे या नगराध्यक्षपदी निवडून आल्या होत्या. त्यानंतर उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या प्रियांका दामले यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली होती. याच काळात भाजपाकडून तुषार आपटे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

तुषार आपटे हे या प्रकरणात तब्बल ४० दिवस फरार होते. नंतर अटक झाल्यानंतर सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. मात्र, अशा गंभीर गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची राजकीय नियुक्ती झाल्याने निर्माण झालेला वाद अखेर त्यांच्या राजीनाम्याने शमल्याचे चित्र आहे.


Protected Content

Play sound