नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दोन वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 500 आणि 1000 च्या नोटाबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा नोटाबंदीचा निर्णय भाजपाच्या फायद्यासाठी घेण्यात आला असून भाजपाचा हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. कॉंग्रेसने एका वेबसाईटच्या हवाल्याने एक व्हिडीओ जारी केला असून त्यात 31 डिसेंबर 2016 नंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून जुन्या नोटा बदलण्याचे काम सुरु असल्याचे दिसत आहे.
काँग्रेस नेते कपिल सिब्बल, रणदीप सुरजेवाला, अहमद पटेल, गुलाब नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपावर हा आरोप लावला आहे. कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, देशातील चौकीदार देशासोबत गद्दारी करत आहेत. सामान्य माणसांचा पैसा त्यांच्या खिशातून चोरत आहे असा आरोप करत एक व्हिडीओ प्रसिद्ध केला त्यामध्ये पत्रकारांनी मिळून नोटाबंदीवर विशेष शोध मोहीम केली असल्याचा दावा करण्यात आला आहे. नोटाबंदीमुळे देशाचा आर्थिक विकास दर घटला. शेतकऱ्यांना नुकसान झाले. छोट्या व्यापाऱ्यांवर संकट आले. व्हिडीओमध्ये दाखविण्यात आले आहे की, 500 रुपयांच्या नोटा असलेले 5 करोडच्या बदल्यात 2000 रुपयांच्या नवीन नोटा असलेले 3 करोड रुपये देण्यात येत होते. दरम्यान कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेच्या शेवटी जाताना सांगितले की, या व्हिडीओची पुष्टी आम्ही करत नाही, हा व्हिडीओ आम्ही काढला नसून हा व्हिडीओ त्यांना एका वेबसाईटवर मिळाला आहे. ज्यामध्ये अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या व्हिडीओमध्ये जे दाखविण्यात आले आहे त्याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे.