Home राजकीय बिहार निवडणुकीनंतर भाजपाची मोठी कारवाई; माजी केंद्रीय मंत्री आर.के. सिंह सहित तीन...

बिहार निवडणुकीनंतर भाजपाची मोठी कारवाई; माजी केंद्रीय मंत्री आर.के. सिंह सहित तीन नेते पक्षातून निलंबित

0
163

पटना-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) प्रचंड यश मिळवत २४३ पैकी २०० हून अधिक जागांवर विजय मिळवला. भाजपाने तब्बल ८९ जागांवर आघाडी घेत इतिहास रचला असून बिहारमध्ये पुन्हा एकदा ‘नितीश राज’ परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र या प्रचंड विजयाच्या आनंदातही भाजपाने पक्षविरोधी कार्याची गंभीर दखल घेत मोठी कारवाई केली आहे. माजी केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांच्यासह तीन नेत्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या एका दिवसात भाजपाने कठोर निर्णय घेतला. आर. के. सिंह यांच्या अलीकडील विधानांनी आणि त्यांच्या वर्तणुकीने पक्षाच्या शिस्तीचे उल्लंघन झाल्याचे नमूद करत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. पक्षविरोधी कामे आणि नेतृत्वावरील उघड टीकेमुळे त्यांना थेट पक्षातून काढून टाकण्यात आले. त्यांच्यासोबतच बिहार विधान परिषदेचे सदस्य अशोक अग्रवाल आणि कटिहारच्या नेत्या उषा अग्रवाल यांनाही निलंबनाची नोटीस देण्यात आली.

भाजपाने या तिघांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, त्यांच्या कृतीमुळे पक्षाचे नुकसान झाले असून हे शिस्तभंगाच्या कक्षेत येते. त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच ‘पक्षातून का काढून टाकू नये?’ याचे कारण एका आठवड्यात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आर. के. सिंह यांनी गेल्या काही महिन्यांत सातत्याने पक्ष नेतृत्वापासून स्वतःला दूर ठेवले होते. त्यांनी प्रशांत किशोर यांच्या विधानांना खुले समर्थन दिले होते. निवडणूक प्रचारादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा व पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकींसाठीही अनुपस्थित राहिले. त्यांच्या विधानांमुळे आणि आक्रमक भूमिकेमुळे भाजपामध्ये नाराजी निर्माण झाली होती. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी नितीश कुमार सरकारवर केलेले गंभीर आरोप पक्षासाठी अडचणीचे ठरले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे संकेत आधीच मिळाले होते आणि अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले.

या निलंबनामुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आगामी सरकार रचनेच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपाने पक्षशिस्तीचा संदेश स्पष्टपणे दिला आहे.


Protected Content

Play sound