श्रीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | श्री माता वैष्णोदेवी मतदारसंघात भाजपाने विजय मिळवला आहे. भाजपासाठी हा खूप दिलासादायक विजय आहे. कारण, लोकसभा निवडणुकीत भाजपाने उत्तर प्रदेशमधील अयोध्या मतदारसंघ गमावला होता. लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी म्हणजेच जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येतील बहुप्रतीक्षित राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला.
श्री माता वैष्णो देवी मतदारसंघ यंदा नव्यानेच तयार करण्यात आला आहे. २०२२ साली जम्मू-काश्मीरमधील मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर रईसी व उधमपूर मतदारसंघांमधून श्री माता वैष्णो देवी विधानसभा मतदारसंघ स्वतंत्रपणे नव्याने अस्तित्वात आला आहे. या मतदारसंघात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडले होते. या मतदारसंघाची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने कुठलीही कसर सोडली नाही. तसेच अयोध्येतील पराभवानंतर भाजपाला कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ जिंकायचा होता. भाजपाने त्यांचे लक्ष्य साधलं आहे. भाजपा उमेदवार बलदेव शर्मा यांनी वैष्णोदेवी मतदारसंघात विजय मिळवला आहे. याआधी रईसी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे भाजपाचे उमेदवार बलदेव राज शर्मा यांच्यासमोर फार मोठे आव्हान नव्हते.
श्री माता वैष्णो देवी मतदारसंघातील मतांची मोजणी पूर्ण झाली असून आठ फेऱ्यांमध्ये बलदेव शर्मा यांना १८,९१९ मतं मिळाली आहेत. तर, अपक्ष उमेदवार जुगल किशोर यांना १६,२०४ मतं मिळाली आहेत.. काँग्रेसच्या भूपींदर सिंह यांना ५,६५५, तर पीडीपीच्या शाम सिंह यांना ४,१९१ मते मिळाली आहेत. बलदेव शर्मा यांच्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान होतं ते बारीदार अर्थात वैष्णो देवी मंदिराच्या रखवालदार समुदायाचं. आधी हा समुदाय भारतीय जनता पार्टीच्या बाजूने होता. परंतु, यंदा या समुदायाने शाम सिंह यांच्या रुपात त्यांचा स्वत:चा उमेदवार उभा केला होता.