मुंबई । परमबीरसिंग यांच्या पत्रातील आरोपांप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चौकशी करण्याची मागणी भाजपने केली असून याबाबतचा ठराव प्रदेश कार्यकारिणीत मांडण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही सीबीआय चौकशी करावी, असा ठराव भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत मांडला जाणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब संदर्भात अजित पवार आणि शिवसेना नेते- परिवहन मंत्री अनिल परब यांची चौकशी करण्याची मागणी केली जाणार आहे.
या ठरावात म्हटले आहे की, गृहमंत्र्यांवरील वसुलीच्या आरोपाप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्यावर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने वसुलीचा आरोप केला. परमबीर सिंग यांच्या पत्राच्या आधारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. तशीच सीबीआय चौकश अजित पवार आणि अनिल परब यांचीही करावी, अशी मागणी कार्यकारिणीने केली आहे.