मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर अवघ्या २४ तासांतच राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. मतदान होण्याआधीच मुंबईतील दोन वॉर्डांमध्ये भाजप आणि महायुतीला मोठा धक्का बसला असून, या ठिकाणी कमळाचे उमेदवार रिंगणाबाहेर पडले आहेत. परिणामी या दोन्ही प्रभागांतून महायुतीची थेट माघार झाल्याचे चित्र आहे.

मुंबई महानगरपालिकेतील वॉर्ड क्रमांक २११ आणि वॉर्ड क्रमांक २१२ मध्ये भाजपचा एकही उमेदवार वैध ठरलेला नाही. वॉर्ड क्रमांक २११ मध्ये खुल्या प्रवर्गातून भाजपने शकील अन्सारी यांना उमेदवारी दिली होती. मात्र आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वीकारला नाही. त्यामुळे या वॉर्डमध्ये भाजप प्रत्यक्षात निवडणूक रिंगणातच उतरू शकला नाही.

तसेच वॉर्ड क्रमांक २१२ मध्ये भाजपच्या उमेदवार मंदाकिनी खामकर यांचा अर्जही बाद ठरला. एबी फॉर्म मिळाल्यानंतर त्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यालयात १५ मिनिटे उशिरा पोहोचल्या. नियोजित वेळेच्या अटींचे उल्लंघन झाल्याने निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. या दोन्ही वॉर्डांमध्ये भाजपकडून तांत्रिक कारणांमुळे उमेदवारीच वैध न ठरल्याने इतर पक्षांना जणू बाय दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
वॉर्ड क्रमांक २१२ मध्ये ठाकरे बंधूंच्या आघाडीने मनसेच्या श्रावणी हळदणकर यांना उमेदवारी दिली आहे. या वॉर्डात अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी, काँग्रेससह इतर पक्षांचे उमेदवारही रिंगणात असले तरी ठाकरे बंधूंच्या एकत्रित राजकीय ताकदीमुळे श्रावणी हळदणकर यांचे पारडे जड मानले जात आहे. त्यामुळे याच निमित्ताने मुंबईत मनसेला पहिल्या विजयाची चाहूल लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, मुंबईत भाजपला या दोन प्रभागांत धक्का बसला असला तरी राज्यातील इतर महानगरपालिकांमध्ये मात्र भाजपसाठी आनंदाची बातमी आहे. मतदानापूर्वीच भाजपचे चार नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक १८ ‘अ’ मधून रेखा राजन चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र अंतिम मुदतीपर्यंत त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांचा विजय निश्चित झाला.
याच महानगरपालिकेत पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आसावरी केदार नवरे यांनीही पॅनल क्रमांक २६ (क) मधून खुल्या प्रवर्गात उमेदवारी दाखल केली होती. त्यांच्या विरोधात कोणताही उमेदवार नसल्याने त्या बिनविरोध निवडून आल्या. तसेच पनवेल महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक १८ (ब) मधून नितीन पाटील यांची बिनविरोध नगरसेवकपदी निवड झाली आहे. धुळे महानगरपालिकेतही भाजपच्या उज्ज्वला भोसले या प्रभाग क्रमांक १ मधून बिनविरोध विजयी झाल्या आहेत.
एकूणच, मुंबईत दोन वॉर्डांत भाजपसाठी निराशाजनक चित्र असले तरी राज्याच्या इतर भागांत बिनविरोध विजयांमुळे पक्षाने काही अंशी आघाडी राखली आहे. येत्या निवडणुकीत ही राजकीय गणिते कशी बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



