मुंबई, वृत्तसंस्था | भाजपा अजूनही संपर्कात आहे का ? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, रोज नवनवे प्रस्ताव येत असतील तर त्या चर्चेला काही अर्थ नाही. जे काही ठरलं होतं ते ठरलं होतं, मला खोटं ठरवण्यात आलं त्यामुळे माझा संताप झाला असं उद्धव ठाकरे यांनी आज (दि.१२) सायंकाळी एका पत्रकार परिषदेत सांगितले.
ठाकरेंना त्याच पत्रकार परिषदेत युती तुटली का? हा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला मात्र त्यांनी बगल दिली. भाजपाने परवा आम्हाला आघाडीसोबत जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. मित्राचा सल्ला आम्ही ऐकला आहे, असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. जे काही ठरेल ते जगजाहीर होणार आहे, आम्ही लपूनछपून काही करत नाही, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्राचं सरकार चालवणं हा काही पोरखेळ नाही. संख्याबळ आणि पाठिंब्याची पत्रं आमच्याकडे नव्हती. त्यामुळेच आम्ही ४८ तासांची मुदत मागितली होती. मात्र राज्यपालांनी आम्हाला मुदत दिली नाही. आता राष्ट्रपती राजवट लागल्याने आम्हाला सहा महिन्यांचा कालवधी मिळाला आहे. एवढे दयावान राज्यपाल आम्हाला कधी लाभलेच नव्हते. वेगळ्या विचारधारेचे प्रश्न एकत्र कसे येणार, हा सगळ्यांसमोर पडलेला प्रश्न आहे. भाजपा आणि मुफ्ती मोहम्मद कसे एकत्र आले ? पासवान आणि भाजपा कसे एकत्र कसे आले ? चंद्राबाबू आणि भाजपा एकत्र कसे आले होते ? याची माहिती मागितली आहे, असेही ठाकरेंनी यावेळी म्हटले.
भाजपाने आमच्यासोबत ठरवलेल्या गोष्टी होत्या त्यात अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद ठरवलेच होते. मात्र भाजपाने मला खोटे ठरवले आणि ते माझ्यासाठी संतापजनक होते. हिंदुत्त्व ही आमची विचारधारा आहे. हिंदुत्त्वाला वचनबद्धता हे महत्त्वाची आहे. देशात रामराज्य आले पाहिजे, असे आम्हाला वाटते कारण रामराज्य आणावे ही आमची संकल्पना आहे. अरविंद सावंत यांना धन्यवाद द्यायचे आहेत कारण शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो असेही ठाकरे अवेळी म्हणाले.