मुंबई प्रतिनिधी । देशात भाजपचे सरकार आल्यापासून देशभरात हिंसेचं वातावरण निर्माण केले. विकासाबाबतचे चित्र नाही. कुठे गेल्या नोकऱ्या? कुठे गेला काळा पैसा? असे सवाल करत भाजपने देशातील जनतेला धर्मप्रेम आणि देशभक्ती शिकवू नये, अशा शब्दांत अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने भाजपवर टिका केली.
काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उर्मिला मातोंडकरने भाजपवर जोरदार हल्ला चढवला. सत्तेवर येण्यापूर्वी त्यांनी विकासाची स्वप्न दाखवली. पण ही स्वप्न परीकथा नसून पिशाच्च कथा झाली आहेत, असा टोलाही तिने लगावला. जी आश्वासनं दिली ती कुठे आहेत? असे प्रश्न उपस्थित करतानाच धर्म म्हणजे काय? खरा देशभक्त कोण? हे सांगणारे तुम्ही कोण आहात? असा सवालही तिने केला. हे सारे असतांना जनतेने दिलेला मतदानाचा अधिकार विचारपूर्वक वापर करावा, असे आवाहन उर्मीला मातोंडकर यांनी केले. धर्म-जात या आधारे विचारले जाणारे प्रश्न बिनबुडाचे आहेत. त्यापेक्षा बेरोजगारी, महिलांचे प्रश्न, कर, मराठी माणसांचा मुद्दा आदी प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, हेही तिने स्पष्ट केले आहे.