मुंबई (वृत्तसंस्था) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थित जे ठरले होते, त्याचा लेखी प्रस्ताव आम्हाला द्या, तरच चर्चा करू. आम्ही चर्चेला तयार आहोत. पण ठरले तेच झाले पाहिजे, त्यासाठी वेगळ्या प्रस्तावाची गरज नाही, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आज स्पष्ट केले आहे.
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत शिवसेनेला नवा प्रस्ताव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्री बनविण्यावर चर्चा होऊ शकते, असे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. मुनगंटीवार यांच्या या भूमिकेचे संजय राऊत यांनी स्वागत केले आहे. गेल्या १२ दिवसात भाजपकडून आलेले हे पहिलेच समंजसपणाचं निवेदन आहे. अडीच अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रिपद घेण्याची भूमिका आधीच घेतली असती तर एवढा वाद झालाच नसता, असे सांगतानाच शिवसेनेकडून प्रस्ताव आला नाही कसे म्हणता? निवडणुकी आधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थित जे ठरले तोच प्रस्ताव होता. त्यासाठी वेगळ्या प्रस्तावाची गरज काय? शहा यांनी राजमुद्रा उमटवलेल्या प्रस्तावाचीच अंमलबजावणी झाली पाहिजे. हा वनलाइन प्रस्ताव आहे. हाच प्रस्ताव भाजपने लिखित द्यावा. मगच पुढची चर्चा होईल, असे राऊत यांनी ठणकावले आहे.