पहूर, ता. जामनेर, (वार्ताहर ) पहूर पेठ येथील गृप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी (दि.३जुन) रोजी मतदान घेण्यात आले. यात शाम सावळे यांना १० मते मिळून ते विजयी झाले आहेत. पराभूत उमेदवार महेराज बी.शेख बिस्मिल्ला यांना सात मते मिळाली.
पहूर पेठचे उपसरपंच रवींद्र मोरे यांचा एक वर्षाचा कालावधी पुर्ण झाल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आज त्या पदासाठी मतदान घेण्यात आले होते. त्यात सत्ताधारी भाजपा तर्फे महेराज. बी. शेख बिस्मिल्ला यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शाम सावळे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार निवडणूक होऊन यात शाम सावळे यांचा १० विरूद्ध सात अशा तीन मतांनी विजय झाला. या निवडणुक प्रक्रियेत पीठासीन अधिकारी म्हणून सरपंच निताताई पाटील यांनी तर निवडणूक सहायक अधिकारी म्हणून ग्रामसेवक सी.एच. वाघमारे यांनी काम पाहिले.
भाजपचे फुटीर सदस्य कोण?- गेल्यावर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप प्रणित पॅनलचे लोक नियुक्त सरपंच व नऊ सदस्य असे एकूण १० तर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पॅनलचे आठ सदस्य विजयी झाले होते. मात्र आज रोजी उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या दोन फुटीर सदस्यांमुळे आज तीन मतांनी शाम सावळे यांची निवड झाली.
शाम सावळे यांची उपसरपंचपदी निवड झाल्याने त्यांचे फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. यावेळी माजी जि.प.कृषी सभापती प्रदिपभाऊ लोढा, माजी जि.प.सदस्य कैलास पाटील, जि.प सदस्या प्रमिलाबाई पाटील, पं.स.सदस्या पुजा भडांगे, निलेश भगत, शैलेश पाटील, भिका पाटील, ईका पैलवान, ईश्वर बारी, शांताराम पाटील, चांदखा तडवी, शरद सोनार, अरूण घोलप, वसीम शेख नसीम, कैलास गोंधनखेडे, यांच्यासह कार्यकर्ते यांनी सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.