Home प्रशासन सावदा ग्रामीण रुग्णालयाच्या नामांतरासाठी भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचा इशारा

सावदा ग्रामीण रुग्णालयाच्या नामांतरासाठी भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचा इशारा


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सावदा येथील ग्रामीण रुग्णालयास ‘राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज ग्रामीण रुग्णालय’ असे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष व शिवसेना (शिंदे गट) येथील कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत कार्यकर्त्यांनी प्रशासनास इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर रुग्णालयाचे नामकरण करण्यात आले नाही, तर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात येईल.

या मागणीसाठी मूळ अर्ज २६ मे २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आला असून, यापूर्वीही १९ मे रोजी कार्यकर्त्यांनी लाक्षणिक उपोषण करत आपली मागणी अधोरेखित केली होती. मात्र, त्या वेळी प्रशासनाकडून कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आलेला नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मागणी गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असल्याची माहितीही त्यांनी दिली.

सदर रुग्णालयाच्या नामकरणास ऐतिहासिक व सामाजिक पार्श्वभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सार्वजनिक संस्थांना ओळख देणे हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अभिमानाचा भाग असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, नुकताच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांचा समावेश झाल्याबद्दल देशभरात जल्लोष सुरू आहे. या ऐतिहासिक विजयाचे श्रेय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीला देण्यात येत आहे.

मात्र, एवढ्या महत्त्वाच्या मागणीस दिरंगाईने प्रतिसाद मिळत असल्यामुळे सामान्य नागरिकांमध्येही नाराजी आहे. रुग्णालय हे आरोग्यसेवेशी थेट संबंधित असल्यामुळे त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आल्यास नव्या पिढीमध्ये इतिहासाविषयी अभिमान निर्माण होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

या नामकरणासाठी लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले असून, जर प्रशासनाने यास दाद दिली नाही तर तीव्र आंदोलन हाती घेतले जाईल, असा इशारा देत कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नामकरणास विलंब झाल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीसाठी संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound