एरंडोल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । एरंडोल नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने नगराध्यक्षपदासह प्रभागांमध्ये एकतर्फी यश मिळवत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तब्बल तीन दशकांपासून पालिकेवर असलेले युतीचे राजकीय बळ या निवडणुकीत ठळकपणे दिसून आले असून, मतदारांनी स्पष्ट कौल देत भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांवर विश्वास टाकला आहे.
या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने अकरा प्रभागांतील एकूण पंधरा जागांवर विजय मिळवला आहे. यामध्ये भाजपने नगराध्यक्षपदासह चार प्रभागांमध्ये तर शिवसेनेने अकरा प्रभागांमध्ये यश संपादन केले. राष्ट्रवादी काँग्रेसला मुस्लिमबहुल असलेल्या केवळ एका प्रभागात तीन जागांवर समाधान मानावे लागले, तर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसला निवडणुकीत पूर्ण अपयशाला सामोरे जावे लागले. याशिवाय पाच अपक्ष उमेदवार विजयी झाले असून त्यामध्ये शिवसेना समर्थक चार आणि भाजप समर्थक एका उमेदवाराचा समावेश आहे.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गायत्री पाटील यांचा तब्बल ९ हजार ३५४ मतांनी पराभव करत एकतर्फी विजय मिळवला. डॉ. ठाकूर यांच्या विजयामागे शहरातील त्यांचा सातत्यपूर्ण संपर्क, उच्च शिक्षण, स्वच्छ चारित्र्य, पालिका प्रशासनातील अनुभव, विनम्र स्वभाव तसेच भाजप-शिवसेना युतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेला नियोजनबद्ध प्रचार महत्त्वाचा ठरला. नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्यांनी शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी साधलेला थेट संवादही निर्णायक ठरल्याचे बोलले जात आहे.
निवडणूक युतीच्या माध्यमातून लढवण्यात आल्याने भाजप आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकदिलाने प्रचारात उतरले होते. कॉर्नर सभा, मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क, मागील दहा वर्षांत शहरात झालेली विकासकामे, आगामी विकासाचे नियोजन, आमदार अमोल पाटील यांचा थेट प्रचारातील सहभाग आणि शहरातील मजबूत संघटन याचा युतीच्या उमेदवारांना मोठा फायदा झाला. उमेदवार निवडताना निवडून येण्याची क्षमता हा प्रमुख निकष ठेवून केलेले नियोजन यशस्वी ठरले.
याउलट राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या प्रचारात ठोस नियोजनाचा अभाव दिसून आला. शहरातील विस्कळीत संघटन, अत्यल्प कार्यकर्ते आणि अनेक प्रभागांमध्ये उमेदवारच नसणे याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसला सहन करावा लागला.
या निवडणुकीतील एक विशेष बाब म्हणजे नगरपालिकेतील कर्मचाऱ्याचा मुलगा नगराध्यक्षपदी निवडून येणे. नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांचे वडील धुडकू ठाकूर हे नगरपालिकेच्या दवाखान्यात कर्मचारी होते, तर त्यांची आई निवृत्त शिक्षिका आहेत. कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील व्यक्ती नगराध्यक्ष झाल्याने पालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
निवडणुकीत चार जोडपी रिंगणात उतरली होती. यामध्ये दोन जोडप्यांना यश मिळाले तर दोन जोडप्यांना पराभव स्वीकारावा लागला. नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी माजी उपनगराध्यक्षा डॉ. गितांजली ठाकूर यांनी प्रभाग क्रमांक दोन अ मधून भाजपच्या उमेदवार म्हणून विजय मिळवला. युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. मनोज पाटील आणि त्यांच्या पत्नी कल्पना पाटील यांनीही शिवसेनेतर्फे विजय संपादन केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गायत्री पाटील व त्यांचे पती दीपक पाटील तसेच माजी नगरसेवक विजय महाजन व त्यांच्या पत्नी मंगला महाजन यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला.
एकूणच, एरंडोल नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने संघटनबळ, नियोजनबद्ध प्रचार आणि विकासाच्या मुद्द्यांवर विजय मिळवत शहराच्या राजकारणावर आपली पकड कायम ठेवली असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.



