कन्नूर (केरळ) कन्नूर तुरुंगात माकप कार्यकर्ते के. पी. रवींद्रन यांची हत्या केल्याप्रकरणी शुक्रवारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) नऊ कार्यकर्त्यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावत प्रत्येकी १ लाखाचा दंडही ठोठावला आहे.
आरएसएस आणि भाजपशी संबंधित कैद्यांच्या गटाने ६ एप्रिल २००४ रोजी कन्नूर तुरुंगात कैद असलेल्या माकप कार्यकर्ता के. पी. रवींद्रन यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात रवींद्र गंभीर झाला होता. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले होते. परंतु तोपर्यंत रविंद्रनचा मृत्यू झालेला होता. या प्रकरणी थालास्सेरी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने पवित्रन, फाल्गुनन, के. पी. रेघू, सनल प्रसाद, पी. के. दिनेश, के. ससी, अनिल कुमार, सुनी आणि अशोकन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रवींद्रन यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी तुरुंगात कैद असलेल्या भाजप-आरएसएसच्या सर्व ३१ कार्यकर्त्यांवर आरोप ठेवण्यात आले होते. मात्र, त्यातील नऊ जणांनाच दोषी ठरवण्यात आले. दरम्यान, तुरुंगात झालेली ही देशातील पहिली ‘राजकीय हत्या’ होती, असे बोलले जाते.