जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भाजप आणि राष्ट्रवादी सोबत जाणार असल्याचा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतांनाच भाजपने याचा साफ इन्कार केला आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, सध्या जळगावात प्रचंड वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमिवर आज पत्रकारांशी बोलतांना ना. गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता तर राज्यात भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार आले असता असा खळबळजनक दावा केला. यासाठी त्यांनी पहाटेच्या शपथविधीचा संदर्भ देखील दिला. गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतांना भाजपतर्फे याबाबत प्रतिक्रिया देखील आली.
आज दुपारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना ठाण्यात पत्रकारांनी नेमका हाच प्रश्न विचारला. यावर उत्तर देतांना त्यांची धांदल उडाली. ते म्हणाले की, आम्ही राष्ट्रवादीसोबत जाण्याचा प्रश्नच उदभवत नाही. आमच्याशी उध्दव ठाकरे यांनी धोकेबाजी केली होती. आधी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले होते. यानंतर दोन्ही पक्षांची एकत्रीत प्रचार करून देखील त्यांनी निकालानंतर वेगळा मार्ग निवडला. तथापि, एकनाथ शिंदे हे आमच्या सोबत आले. मात्र यापुढे राष्ट्रवादी सोबत जाण्याचा कोणताही विचार नसल्याचे बावनकुळे म्हणाले. यामुळे त्यांनी गुलाबराव पाटील यांचा दावा खोडून काढला आहे.