मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री पदावर अडून बसल्यामुळे भाजपने शिवसेनेला सुरुवातीच्या प्रस्तावात घातलेल्या अटी-शर्तींमध्ये फेरविचार करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. सुरुवातीला भाजपने मुख्यमंत्री पदासह गृह, महसूल, नगर विकास आणि वित्त या चार महत्वाच्या खात्यांवर चर्चा होणार नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र आता या चार खात्यांपैकी महसूल आणि वित्त शिवसेनेला देऊ करुन त्यांची नाराजी दूर करता येईल का? याबाबतची तपासणी भाजपकडून सुरु आहे.
आज मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे दोघेही ओल्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. आज रात्री मुख्यमंत्री दौऱ्याहून मुंबईत परतल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विजय पुराणिक आणि व्ही सतीश यांच्यासह मुख्यमंत्र्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत मुख्यमंत्री पदावरून अडून बसलेल्या शिवसेनेला सोबत घेण्यासाठी काय पर्याय आहेत?, यावर चर्चा केली जाणार आहे. उद्यापर्यंत या पर्यायांवर शिवसेनेकडून सकरात्मक प्रतिसाद मिळाला तर सत्ता स्थापनेचा दावा केला जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेसोबत सर्व वाटाघाटी पूर्ण करुन 7 नोव्हेंबरपर्यंत महायुतीचे सरकार स्थापन करण्याची तयारी भाजप तयारी करत आहे. अर्थात आता हे सगळे शिवसेनेच्या भूमिकेवर अवलंबून आहे.