मुंबई, वृत्तसंस्था | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. केंद्र सरकारकडून अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून आराखडाही सोपवला असेही समजले आहे. दरम्यान भाजपाने शिवसेनेला १६ मंत्रिपदांची ऑफर दिली आहे. मात्र मुख्यमंत्रीपदाची मागणी भाजपाने मान्य केलेली नाही असेही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजले आहे. त्यामुळे भाजपाची ऑफर स्वीकारायची की नाही, याबाबत आता चेंडू शिवसेनेच्या कोर्टात आहे. आता तरी हा पेच सुटेल का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेला १७ खाती हवी आहेत. ज्यामध्ये गृह, अर्थ, नगरविकास आणि महसूल यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांचा समावेश आहे. मात्र भाजपाने १६ खाती देण्यावर सहमती दर्शवली असून त्यामध्ये गृह, अर्थ आणि नगरविकास ही खाती नाहीत. महसूल मंत्रीपद मात्र शिवसेनेला देण्याची तयारी भाजपाने दर्शवली आहे असेही सूत्रांकडून समजले आहे. दरम्यान मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेने सांगितलेल्या दाव्यामुळे चर्चेचे घोडे अडले आहे. आता १६ मंत्रिपदांच्या ऑफरनंतर चर्चा सुरु होणार का ? यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
दिवाळीच्या दिवशी पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचे ठरलेले नाही, असे म्हटल्याने उद्धव ठाकरे नाराज झाले आहेत. त्यानंतर भाजपा आणि शिवसेनेतली चर्चा थांबलेली आहे. दरम्यान आज शिवसेना खासदार संजय राऊत राज्यपालांच्या भेटीला गेले होते. ते सत्तास्थापनेचा दावा करणार नसले, तरीही दबाव तंत्राचा वापर करत आहेत, हे नक्की.